सात जनावरांची सुटका, ३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
गंगापूर, (प्रतिनिधी): शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर पोलिसांनी कारवाई करत ७ जनावरांसह ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे, पोलीस कर्मचारी राठोड आणि होमगार्ड शेख बाबा हे सकाळी सहा वाजता डोणगाव, खडकनारळा परिसरात गस्तीवर असताना पिंपळगाव ते कसाबखेडा फाटा रस्त्यावर एका बोलेरो पिकअपमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता रस्त्याच्या उजव्या बाजूला (एमएच ३० एबी ४०११) बोलेरो पिकअप आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाच बैल, एक गाय आणि एका कालवडीसह सात जनावरे आढळली. या जनावरांची किंमत ७१ हजार रुपये, तर बोलेरो पिकअपची किंमत तीन लाख रुपये, असा एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.












